Module 1
मृदा भूगोलाची ओळख
प्रस्तावना
भूगोल हे पृथ्वीवरील विविध घटकांच्या वितरणाचा अभ्यास करणारे
शास्त्र आहे. या वितरणासोबत विविध घटकांचा आंतरसंबंधाचा अभ्यास भूगोलात होतो. मृदेच्या
वितरणाचा अभ्यास करणारी मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची उपशाखा आहे. मानवाने सुमारे
१०हजार वर्षापुर्वी शेती कला अवगत केली तेव्हापासून मृदेच्या अभ्यासास सुरुवात केली
गेली. उपलब्ध माहिती, वर्णने, मृदा निर्मिती प्रक्रिया व मृदा घटक भूगोलाचा अभ्यास
विषय बनली. प्राचीन काळापासून पृथ्वीच्या भूपृष्ठभागावर विविध प्रदेशात असणाऱ्या मृदांचा
अभ्यास भूगोलात होऊ लागला. रशियन भूगर्भशास्त्रज्ञ व्ही. व्ही. डोकचॉव्ह यांच्या १८७५
नंतरच्या पुरामृदाशास्त्रातील संशोधन कार्यामुळे पारंपारिक मृदा भूगोलास खऱ्या अर्थाने
वैज्ञानिक स्वरुप प्राप्त झाले. यामुळेच त्यांना मृदा भूगोलाचे जनक म्हणतात.
खडक म्हणजे खनिजांचे मिश्रण होय.
खडकांच्या विदारणाने तयार झालेल्या सुक्ष्म कणाच्या समुच्चयास मृदा म्हणतात. मृदा म्हणजे
सेंद्रीय व असेंद्रीय घटकांचे अर्धसंघटीत रुप होय. सांख्यिकी भाषेत मृदा = ४७% खडकांचे
सुक्ष्म चूरा + २५% पाणी + २५% हवा + ३% सेंद्रीय
घटक अशी मांडणी केली जाते. मृदा या प्राकृतिक घटकांचा अभ्यास सुक्ष्मपणे भूगोलाच्या
ज्या शाखेत होतो तीला मृदा भूगोल असे म्हणतात.
विसाव्या शतकात अनेक भूगोलतज्ञांच्या
संशोधन कार्यामुळे मृदा भूगोल ही स्वतंत्र भूगोलाची उपशाखा उदयास आली. विविध तज्ञांनी
मृदा भूगोलाचा सखोल अभ्यासास सुरूवात केली. यापैकी काही निवडक तज्ञांच्या व्याख्या
पुढाल प्रमाणे आहेत.
१.१
व्याख्या
१. बुटझेर,
कार्टर आणि डेल (१९७४) यांच्या मते, ‘कोणत्याही देशाच्या
प्राकृतिक घटनेतील भूरूपांचा, मृदा हा महत्वाचा भाग
आहे. मृदा भूगोलमध्ये मृदेच्या आवरणांचा अभ्यास करणे यावर भर असतो, कारण मृदा मनुष्याच्या संपर्कात असणारे हे भौतिक वातावरण आहे, या मुख्य मुद्द्यावर मृदा भूगोलमध्ये लक्ष
केंद्रित केले जाते.’
२. ब्रिजेस व डेव्हीसन यांच्या
मते, “पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मृदांचा विकास व वितरण नोंदवणे आणि त्यांचे स्पष्टीकरण देणे, हे मृदा भूगोलाचे उद्दीष्ट आहे. भूगोल आणि विज्ञान यांच्या दरम्यानची ही
अभ्यासाची एक शाखा असून ती या दोन्हींचा मूलभूत भाग आहे. (१९८२Principles and Applications of Soil Geography या
पुस्तकामध्ये)
4. दोब्रावेलस्की १९८४ यांच्या मते ‘मृदा वितरणाचा अभ्यास भूगोलाच्या ज्या शाखेत केला जातो तीला मृदा भूगोल असे
म्हणतात. मृदा निर्मितीचे घटक, प्रकिया यानुसार निर्माण होणाऱ्या विविध गुणधर्माच्या
मृदेचा अभ्यास मृदा भूगोलात केला जातो.
4. फोर्डमॅन १९९५ - प्रदेशाप्रदेशातील
प्राकृतिक घटकाच्या विभिन्नतामुळे विविध मृदा का निर्माण होतात? यातील ऐतहासिक आंतरसंबंधाचे विवेचन मृदा
भूगोलात होते.
5. गॅगरिना २००६ E. I. Gagarina- मृदाचे जागतिक वर्गीकरण करून व त्यांच्या
विविधतेनुसार समस्या जाणून घेऊन मृदा व्यवस्थापन करणारी मृदा भूगोल गतिमान शाखा
आहे.
6. पावेल (2008)
यांच्या मते, ‘मृदा भूगोल हे मृदा आच्छादनांच्या स्थानिक वितरणाचा अभ्यास करते, की ज्यामध्ये मृदेच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा, मृदाछेदांचा आणि
मृदेची क्षितीजसमांतर विविधता (स्थानिक) आणि मृदा साधनांच्या वापरासंबंधीचे वर्णन
यांचा समावेश आहे. Soil Geography and Geostatistics - Concepts and Applications या पुस्तकामध्ये
वरील विविध व्याख्यावरुन मृदा भूगोलाची सर्वसाधारण
व्याख्या करता येईल
पृथ्वीवरील विविध प्राकृतिक व मानवी घटकांच्या
परस्पर आंतरक्रियांमुळे तयार होणाऱ्या मृदाचे जागतिक वितरण जाणून घेवून त्यांच्या विविधतेनुसार समस्या जाणून घेऊन
मृदेचे जैविक, रासायनिक व कायिक व्यवस्थापन करणारी भूगोलाची शाखा म्हणजे मृदा भूगोल होय.
१.१.२
मृदा भूगोलाचे स्वरूप
कोणत्याही
विषयाच्या अभ्यास करण्याच्या पध्दतीवरून त्या विषयास त्याचे स्वरूप प्राप्त होत असते.
भूगोलाच्या अभ्यासाचे लिखित पुरावे ग्रीक व रोमन कालखंडापासून आढळतात. तेव्हा पासून
भूगोलाच्या अभ्यास पध्दतीत काळाच्या ओघात बदल घडून आल्याचे प्रकर्षाने आढळून येते.
मृदा भूगोल ही भूगोलाची शाखा जरी विसाव्या शतकात उदयास आलेली असली व तीचे प्रगत स्वरुप
आज आपणास दिसत असले तरी मृदा भूगोलाच्या अभ्यासाला शेतीपासून सुरुवात झालेली आहे हे
प्राचीन ग्रंथ लिखाणातून आढळून येते. त्यावेळची
अभ्यास पध्दती व आजची अभ्यास पध्दतीचा एकत्रित विचार करता काळाच्या ओघात बदलेले मृदा
भूगोलाचे स्वरूप खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल.
अ).
वर्णनात्मक स्वरूप
पृथ्वी
वर्णन करणारे शास्त्र म्हणून भूगोल हे अगदी सुरवातिच्या काळात समजले जात असे. नद्या,
पर्वत, पठारे, वनस्पती, सागर व महासागर आणि वसाहती यांची भूगोलामध्ये करत असत. धर्मप्रसार,
व्यापार व साम्राज्य विस्तारासाठी विविध भूतज्ञांनी
देश वा खंडांचे दौरे पूर्ण करून त्या त्या प्रदेशातील भौगोलिक घटकांचे केलेले निरीक्षण
व घेतलेला अनुभव या आधारे यांची वर्णने समकालीन विचारवंताच्या लिखानात आढळून येतात.
याच विचारवंतांकडून करण्यात आलेल्या दौऱ्या दरम्यान मृदेचाही अभ्यास करण्यात आला. परंतू
मृदेसंदर्भात असलेल्या या नोंदी वर्णनाच्या स्वरूपात प्रामुख्याने आढळून येतात. भौगोलिक
घटकाच्या अभ्यासासाठी वर्णनात्मक अभ्यास पध्दती त्या काळात प्रचलीत असल्याचे स्पष्टपणे
जाणवून येते. अर्थातच मृदेचा करण्यात आलेला अभ्यास अशा अभ्यास पध्दती पासून वेगळा ठरू
शकत नसल्याने मृदा भूगोलशास्त्राचे प्रथम स्वरूप हे वर्णनात्मक असेच होते.
ब)
प्रादेशिक स्वरूप
विविध
देशातील भू अभ्यासकांमार्फत भिन्न भिन्न प्रदेशातील मृदेचा अभ्यास करण्यात आला. परंतू
या अभ्यासातील मृदे संदर्भात करण्यात आलेली वर्णने भिन्न प्रदेश असूनही सारखीच असलेली
आढळून आली. 'म्हणुन मृदेचा अभ्यास प्रदेशनिहाय व्हावा व तो बिनचूक असेल असा एक विचार
प्रवाह पुढे आला व हाच विचार प्रवाह प्रचलीत झाला. जगाची विभागणी प्रदेशात करून तेथील
मृदा अभ्यासली जाऊ लागली. प्रदेश निहाय करण्यात आलेल्या मृदेच्या अभ्यासामुळे त्यामध्ये
आधिक सुस्पष्टता येऊन गुंतागुंत कमी झाली. विस्तृत विभागाचे लहान लहान प्रदेशात विभागणी
करून तेथील मृदाचा अभ्यास करण्याची पध्दत म्हणजे प्रादेशिक पध्दत होय. प्रदेश निहाय
मृदेचे वर्णन या अभ्यास पध्दतीचे वैशिष्टय ठरते.
क)
वस्तुनिष्ट स्वरूप
प्रादेशिक
अभ्यास पध्दती मध्ये भू अभ्यासक एखादा प्रदेश निवडून तेथील भौगोलिक घटकांचा अभ्यास
करीत असे. अर्थातच अशा अभ्यास पध्दती मध्ये सर्वच भोगोलिक घटक विचाराधीन असावयाचे.
त्या मुळे सर्वच घटकांचा सखोल अभ्यास करणे अडचणीचे ठरावयाचे. प्रादेशिक स्वरूपातील
हा दोष दूर करण्याच्या दृष्टीने भू अभ्यासकानी प्रदेशाची निवड करून विविध भौगोलिक घटकांपैकी
एकाचीच निवड करून तो घटक सखोल पध्दतीने अभ्यास करण्याची रीत प्रचलीत झाली. याचा परिणाम
पहाता निवडलेल्या एकमेव घटकाच्या मूळा पर्यंत पोहचून, का? कुठे? व कसे? अशा प्रश्नांची
उत्तरे शोधण्यात येऊ लागली. मृदा भूगोलातही या अभ्यास पध्दतीचा वापर होऊ लागल्याने
या विषयास वस्तुनिष्ट स्वरूप प्राप्त झाले.
ड)
कार्यकारणभाव स्वरूप
मृदा
भूगोलशास्त्रात मृदा निर्मितीचे घटक, मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेचे गुणधर्म, मृदा
वर्गीकरण, मृदा वितरण, मृदा ऱ्हास, कारणे, परिणाम, मृदा संधारण, मृदा व्यवस्थापन व
त्यांच्या पध्दतींचा अभ्यास केला जातो. कार्यकारणभाव अध्ययन पध्दतीत दोन किंवा दोन
पेक्षा जास्त घटकातील संबंध त्यांच्यातील आंतरक्रिया, दोहोंचे एकमेकांवर होणारे परिणाम
इत्यादी सारख्या बाबींना विशेष महत्व दिले जाते किंबहुना अशा तत्वाला मूलाधार मानून
मृदेचा अभ्यास केला जातो. उदा. मृदा व पिकांचे उत्पादन, मृदा व पिकांचे वितरण किंवा
पिक प्रकार.
मृदा
अभ्यासामध्ये अशा स्वरूपाचा अवलंब केल्यामुळे मृदे संबंधी सखोल व नेमकी विभागवार माहिती
प्राप्त होऊ लागली. या शिवाय मृदेच्या विविध अंगे जाणून घेण्यास मदत होऊन मृदा भूगोलशास्त्राची
कक्षा रुंदावून वेगळेच महत्व निर्माण झालेचे दिसून येते.
इ)
सांख्यिकी स्वरूप
भूगोलशास्त्रीय
नियमाना अधिन राहून मृदेचे कार्यकारणभाव अभ्यासण्याच्या पध्दतीने मृदा भूगोलास वेगळेच
महत्व प्राप्त झाले. कार्यकारणभाव स्वरूपा बरोबर मृदेच्या भिन्न भिन्न अंगांचा अभ्यास
करीत असताना त्या अंगांचे मोजमाप करण्याची नविन पध्दत रूढ होऊन मृदा भूगोलशास्त्रास
सांख्यिकी स्वरूप प्राप्त झाले. मृदे संबंधीच्या वर्णन, विश्लेषण व कार्यकारणभाव अभ्यासातून
अचूक अंदाज किंवा निष्कर्षा पर्यंत पोहचण्यासाठी मृदा भूगोलाचे सांख्यिकी स्वरूप महत्वपूर्ण
भूमिका निभावते. मृदा भूगोलशास्त्रात मृदा घटकांच्या मोजमापातून विविध प्रकारची आकडेवारी
उपलब्ध होऊन त्या वरती सांख्यिकी प्रक्रियाचे तंत्रही अवगत झाल्याने मृदा भूगोलाचा
पाया मजबूत होण्यास मदत झालीच शिवाय विश्वासअर्हता निर्माण झाली.
ई)
वैज्ञानिक स्वरूप
वैज्ञानिक
अभ्यास पध्दती मध्ये प्रश्नाची निवड, गृहिते, उद्देश, तथ्य संकलन, माहितीचे वर्गीकरण,
तथ्य विश्लेषण व निष्कर्ष काढले जातात. मृदा अभ्यासा मध्ये हे सर्व संशोधनाचे शास्त्रीय
अधिष्ठान असलेले घटक उपयोगात आणले जातात. मृदा भूगोलात आलिकडील काही दशकात याच अभ्यास
पध्दतीचा वापर अगदी जसाच्या तसा केला जात असल्याने या विषयाचे सद्यःस्वरूप वैज्ञानिक
असल्याचे दिसून येते. मृदेच्या विविध घटकांचा तथ्य आधारीत अभ्यास करून तो वैज्ञानिक
दृष्ट्या प्रमाणीत केला जातो. तसेच त्या आधारीत नवनवीन सिध्दांत व संकल्पना मांडल्या
जातात. यालाच मृदा भूगोलशास्त्राचे वैज्ञानिक स्वरूप म्हणून ओळखले जाते.
प)
गतिशील स्वरूप
मृदा
गतिशील असल्याचे अनेक अभ्यासातून सिध्द झालेले आहे. मृदेची निर्मिती, मृदा निर्मिती
प्रक्रिया, मृदेचे प्राकृतिक व रासायनिक गुणधर्म, मृदा -हास इत्यादी बाबींवरून मृदेची
गतिशीलता स्पष्ट होते. मृदेच्या मूळ स्थितीत अर्थातच मृदेची जाडी, नैसर्गिक व जैविक
प्रक्रिया, गुणधर्म इत्यादीत होणारे बदल विचारात घेऊन त्या अनुषंगाने मृदेचा अभ्यास
करण्याची पध्दत अलिकडील काही काळात अंगीकारली आहे. हेच मृदा भूगोलशास्त्राचे गतिशील
स्वरूप होय.
१.१.३
मृदा भूगोलाची व्याप्ती
मृदा
भूगोलशास्त्र ही प्राकृतिक भूगोलशास्त्राची एक महत्वाची शाखा म्हणून १९व्या शतकाच्या
उत्तरार्धात उदयास आली. तसे पहाता मृदा एक प्राकृतिक घटक परंतु इतर प्राकृतिक घटकाच्या
तुलनेत या घटकास अनन्यसाधारण असे महत्व आहे. कारण पृथ्वीच्या पृष्टभागावरील जैवआवरणाचे
अस्तित्व मूलत: मृदेवर अवलंबून आहे. जैवआवरणाचा अधिवास किंबहुना त्यांच्या अन्नाची
गरज याच घटकाच्या अस्तित्वातून पूर्ण होते. त्या मुळेच मृदा किंवा मृदा अभ्यासाला आजमितीस
वेगळेच महत्व प्राप्त झालेले आहे. मृदेचा विविध अंगानी अभ्यास होऊन या विषयाच्या कक्षा
रुंदावल्याने मृदा भूगोलशास्त्राची व्याप्ती मोठया प्रमाणात विस्तारलेली अनुभवास येते.
मृदा भूगोलशास्त्राची व्याप्ती खालील प्रमाणे सांगता येईल.
१.
मृदा भूगोल व कृषी
कृषी
ही मानवाची प्राथमिक आर्थिक हालचाल असून पिकांची लागवड करणे कृषी व्यवसायाचे अविभाज्य
अंग आहे. पिकांची निकोप वाढ, विकास व अधिकतम उत्पादन मुख्यत्वे करून मृदा प्रकारवर
अवलंबून असते. मृदा प्रकारानुसार मृदेतील असेंद्रीय व सेंद्रीय घटक द्रव्ये नैसर्गिक
पणे निश्चित होत असतात. अशा मृदे संबंधी बाबींचा अभ्यास करून वाढत्या लोकसंख्येच्या
अन्नधान्य तसेच उद्योगांना लागणारा कच्चामाला बाबतच्या मागणींचा समतोल साधण्यासाठी
कृषी तंत्र व पध्दती मध्ये आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे असते. ते आवश्यक बदल या दोहोंच्या
माध्यमातून सहजपणे समजून येतात. अर्थातच मृदेच्या शास्त्रीय अभ्यासातून पिकांसाठी मृदेतील
कमतरतेनुसार योग्य त्या घटक द्रव्यांचा कृत्रीम पणे पुरवठा करून कृषी उत्पादनाची उच्चतम्
मर्यादा साधली जाते. कृषी विकासासाठी मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास गरजेची बाब बनल्याने
या विषयाची व्याप्ती वाढतच गेल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होत आहे.
२.
मृदा भूगोल व उद्योगधंदे
२१
व्या शतकाच्या सुरुवातीस मृदा अभ्यासासंबंधी विविध उद्योगधंदे निर्माण झाले आहेत. खाणकाम
हा व्यवसायाचा प्रत्यक्ष मृदेशी संबंधीत असतो.
सोने, युरेनियम, थेरीयम, बॉक्साइड यासारखी खनिजे ही मृदेतून मिळविली जातात.
याशिवाय
विविध सॉफ्टवेअर कंपनी मृदा विश्लेषण व अभ्यास यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. जीआयएस
कंपन्या व शेतकऱ्यांना मृदेविषयक ऑनलाईन मार्गदर्शन व सल्ला देणारी अनेक सॉफ्टवेअर
तयार झाली आहे. यामध्ये IBM यासारख्या कंपन्यादेखील मागे नाहीत.
मृदा विषयक विविध उपकरणे बनविण्याचेही विविध उद्योगधंदे
जगात उभारलेले आहेत. या उपकरणाव्दारे मृदेच्या विविध अंगाचा अभ्यास केला जातो.
मृदेची गुणवत्ता सुधारण्यावर संशोधन करुन खताचे
उत्पादन करणारे विविध उद्योगधंदे जगात उभारलेले दिसून येतात. कृषी उत्पादने वाढीच्या
अनुषंगाने हे उद्योग असलेले दिसून येतात.
नदी किनारी व गाळाच्या मृदाक्षेत्रात वीटा निर्मितीचा
उद्योग व मातीपासून भांडी आणि विविध वस्तू बनविण्याचा उद्योग आपणास पाहावयास मिळतो.
याशिवाय
अप्रत्यक्षपणे शेतीतून निर्माण होणाऱ्या कच्च्या मालावरती आधारलेले आहेत. उदा. कापड
उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योग इत्यादी. अशा उद्योगांचा
मुलाधार कृषी उत्पादने असून, कृषी उत्पादने मृदेशी निगडीत असल्याने उद्योगांच्या अनुषंगाने
मृदेचा अभ्यास होऊन या विषयाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येते.
३.
मृदा भूगोल व वाहतूक
वाहतूक
ही एक पायाभूत सुविधा असल्याने प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेला अनन्यसाधारण
असे महत्त्व प्राप्त झाले आहे. वहातूक विस्ताराचे धोरण राबवतना व नवे वाहतूक मार्ग
निर्माण करताना मृदांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला जातो. रस्ते, रेल्वे व विमानतळांसाठी
उपयोगात येणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण केले जाते.
या मृदांचा पोत व खनिजे अभ्यासला जातो. पोतावर
मृदेतील पाण्याचा निचरा अवलंबून असतो तर खनिजांवर मृदेतील घट्टपणा व भार सोसण्याची
क्षमता अवलंबून असते. मृदेतील काही खनिजे व मृतिका पाण्यात विरघळून वाहून गेल्यावर
मृदेत पोकळी निर्माण होते यामुळे रस्ते, रेल्वे व विमानमार्ग खचण्याची दाट शक्यता असते. मृदेतील काही खनिजे पाण्याशी संयोग पावून फुगतात
त्यामुळे वाहतूक मार्ग उंचावले जातात, त्यांना भेगा पडतात. यामुळे मृदा अभ्यास वाहतूक
संदर्भातून केला जातो.
सुपीक
जमिनीचे तसेच वन क्षेत्र टाळून वाहतूक विकास साधला जात आहे. अर्थातच वाहतूक व्यवस्थेच्या
व्दारे प्रादेशिक मृदा अभ्यासने मृदा भूगोलशास्त्राचे क्षितीज रूंदावत आहे.
४.
मृदा भूगोल व पर्यावरण
मृदा
ही नैसर्गिक साधन संपत्ती असून नागरिकीकरण व औद्योगीकरणामुळे जगभरात मृदेचे आरोग्य
धोक्यात आले आहे. मृदा आरोग्यावर पुढील घटक क्रिया अवलंबून असतात. १. मृदेतील पाण्याचे
प्रमाण २. मृदा संरचना व सच्छिद्रता, ३. मृदेतील
पोषकमूल्यांचे चक्र, ४. मृदेतील जैविक क्रिया, ५. कार्बनचक्र ६. निरोगी प्राणीजीवन ७. निरोगी वनस्पतीजीवन ८. निरोगी आहार
यासाठी मृदा निरोगी असणे गरजेचे आहे. मृदा धूप,
मृदा प्रदुषण समस्या निराकरण करण्यासाठी मृदा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हे व्यवस्थापन
केल्यास मृदा आरोग्यावर निगडीत घटकात अनुकूल बदल घडून येतील व पर्यावरण संतुलन होईल.
भारतासारख्या देशात मृदा तपासून SOIL HEALTH CARD SCHEME सुरू केली आहे. या योजनेतून
१० कोटी भारतीय शेतकऱ्यांनी असे कार्ड शासनाकडून मिळविले आहे. यामधून मृदेचा सखोल अभ्यास
झाल्याने मृदाभूगोलाची व्याप्तीत भर पडली आहे.
मानवी वस्त्यांचा विस्तार जस जसा वाढत जाऊ लागला तस तसे पिके व जंगलाखालचे
क्षेत्र कमी कमी होऊन मर्यादीत जमिनीवरती अन्नधान्य व कच्चा मालाचा भार पडू लागला.
या शिवाय नैसर्गिक आधिवासात आढळणारी जैव विविधता धोक्यात आली. अर्थातच या सारख्या घटकांच्या
अभ्यासाला पर्यावरणात वेगळेच महत्व आहे. मृदा निर्मिती, प्रकार व तिचे गुणधर्म यांचा
मूलभूत संबंध पर्यावरणाशी आहे. मृदेच्या स्थितीचा जैव विविधतेवरती मोठा प्रभाव पडत
असतोच, शिवाय मृदा एक साधन संपत्ती असल्याने मृदा अभ्यास पर्यावरण शास्त्रात होतो.
त्या अनुषंगाने मृदा भूगोलशास्त्राची व्याप्ती वाढू लागली आहे.
५. मृदा भूगोल व इतर शास्त्र
मृदेत विविध वनस्पतीच्या बीयांना अंकूर फुटतात,
वनस्पती वाढतात, वनस्पतीचा पालापाचोळा मृदेत कुजतो, त्याचे विघटन होते. अशा विविध जैविक
क्रियांचा अभ्यास मृदा अभ्यास वनस्पतीशास्त्रात केला जातो. सुक्ष्मजीवशास्त्रात व जैवतंत्रज्ञान
या शाखेत मृदेतील विविध सुक्ष्म जीवांचा अभ्यास केला जातो. मृदेत होत असलेल्या सुक्ष्म
जीवजंतू क्रिया, कवक, बुरशी अभ्यास केला जातो. मृदेचा अभ्यास वनस्पतीशास्त्रात व सुक्ष्मजीवशास्त्रात
व जैवतंत्रज्ञान केला जातो.
मृदा
थर व पाण्याचा जवळचा संबंध असतो. भूपृष्ठाखाली असणारे मृदा थरात भूजल साठलेले असते.
याचा अभ्यास भूगर्भशास्त्रज्ञ करीत असतात. अतिसिंचनामुळे निर्मााण होणाऱ्या क्षारपड
मृदा व दलदलयुक्त मृदांचे रासायनिक गुणधर्म रसायनशास्त्रात अभ्यासले जातात. यामधून
मृदा भूगोलाचा अभ्यास सखोल होवून मृदा भूगोलाची व्याप्ती वाढलेली दिसून येते.
६.
मृदा भूगोल व लोकजीवन
जगाच्या
पाठीवर कोणत्याही प्रदेशातील लोकजीवनाची समृध्दी तेथील मृदेवरती अवलंबून असते. नाईल,
सिंधू, तैग्नीस, युप्रॉटीस इत्यादी नद्यांची खोरी मानवी संस्कृतीचा उगम, विकास व विस्ताराची
स्थाने म्हणून ओळखली जातात. केवळ तेथील मृदा
व नियमीत पाणीपुरवठयामुळे आजही जगातील दाट लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश पाहीले तर
नद्यांची खोरी, मैदानी प्रदेश व सागरी तटवर्ती प्रदेश निर्देशीत होतात.
सुपीक
जमिनी बरोबरच कृषी उत्पादनाची खात्री तसेच अशा प्रदेशातील सुखकर जीवनामुळेच लोकजीवन
नियीमत पणे फुलत जाते. म्हणुनच लोकजीवनाचा अभ्यास करीत असताना तेथील मृदेचा अभ्यास
होऊन मृदा भूगोलशास्त्राची व्याप्ती वाढल्याचे आढळून येते.
मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासाची
गरज कृषीप्रधान देशाबरोबरच इतर देशात ही अनेक करणांमुळे भासू लागली. विविध हवामानातील
मृदेचा अभ्यास करून त्या मृदेचा वापर उत्पादकतेसाठी करुन घेता येऊ शकेल का? या हेतूने
मृदेचा अभ्यास संशोधन प्रक्रियेतून होऊ लागला. आजमितीस जगभरातील अनेक विद्यापीठातून
मृदेचे अध्ययन व अध्यापन होत आहे. शिवाय महाविद्यालयीन स्तरावरती हा विषय शिकवला जातो.
अर्थातच या वरून या विषयाच्या व्याप्तीची कल्पना येते. विविध शास्त्र व मृदा भूगोल
सहसंबंधाच्या अभ्यासातून या ज्ञान शाखेची व्याप्ती वाढत गेलेली स्पष्टपणे दिसून येते.
मृदा
भूगोलशास्त्राचे अध्ययन क्षेत्र अमर्याद असल्याने अभ्यासाच्या सोयीसाठी या विषयाच्या
दोन शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे :
१)
सामान्य मृदा भूगोलशास्त्र व २) प्रादेशिक मृदा भूगोलशास्त्र
1.5
मृदा भूगोल व मृदाशास्त्राचा इतिहास
HISTORY
OF SOIL GEOGRAPHY AND PEDOLOGY
मानव
भटकंती ही अवस्था संपून एका ठिकाणी स्थिर झाला तेव्हापासून मृदांचा अभ्यास खऱ्या अर्थाने
सुरु झाला. ग्रीक, रोमन, अरब, अशियातील प्राचीन भूगोल तज्ञांनी मृदेचा अभ्यास केला
होता. परंतु स्वतंत्र ज्ञान शाखा म्हणून मृदा भूगोल व मृदाशास्त्र यांची ओळख १८६० नंतर
निर्माण झाली. त्यापूर्वी मृदा हा घटक भूगर्भशास्त्राचा अभ्यास घटक मानला जात होता.
सन १८६२ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ फेडरिक फालोअ Friedrich Fallou याने पहिल्यांदा
pedology मृदाशास्त्र ही संकल्पना मांडली.
मृदा या घटकाचा अभ्यास मृदा
भूगोल व मृदाशास्त्र या दोन शाखामध्ये केला जातो. मृदा भूगोलाचा अभ्यास करताना शास्त्रज्ञ
किंवा अभ्यासक प्राकृतिक घटकांना महत्त्व देऊन मृदेचा अभ्यास करतात तर मृदाशास्त्रात
मृदेची निर्मिती, रासायनिक घटक, मृदेची रचना व आकार, मृदा स्तर इत्यादी गोष्टींचा अभ्यास
केला जातो. सद्या मृदा भूगोल व मृदाशास्त्र खऱ्या अर्थाने स्वतंत्र शाखा आहेत परंतु
मृदा हा सामाईक घटक दोन वेगवेगळ्या दृष्ठीकोनातून अभ्यासतात. यांचा अभ्यास काही ठिकाणी
संमिश्र असल्यामुळे त्यांचा इतिहास हा एकत्र अभ्यासणे सोईचे ठरेल.
लोकसंख्या
वाढ, अन्नधान्याची वाढती मागणी, महायुद्धे यामुळे शेतीच्या उत्पादनाची मागणी वाढली.
जार्ज वॉशिग्टन कार्व्हर यासारख्या शेतीतज्ञांने मृदेचा अभ्यास अन्नधान्याचे उत्पादन
वाढीसाठी सुरू केला. मृदा भूगोल व मृदाशास्त्राच्या अभ्यासात खऱ्या अर्थाने रशियन व
अमेरिकन शास्त्रज्ञांचे मोलाचे योगदान आहे. पहिल्यांदा 'मृदा भूगोलाचा अभ्यास रशियन
शास्त्रज्ञ व्ही. व्ही. डोकुचॉब्ज (V. V. Dokuchaev) यांनी केला. यामध्ये त्यांनी रशियातील
मृदा व नैसर्गिक घटकांचा सहसंबंध अभ्यासून 'मृदा भूगोलाची मूलतत्त्वे' हा महत्वाचा
ग्रंथ प्रकाशित केला. तसेच मृदा सर्वेक्षण, मृदेची रचना, मृदा वर्गीकरण, मृदा नकाशे
इत्यादी वेगवेगळ्या घटकांनुसार मृदा भूगोलाचा अभ्यास केला. या मोलाच्या कार्याबद्दल
त्यांना 'मृदा भूगोलाचा जनक असे म्हणतात.
मृदा
भूगोल व मृदाशास्त्राचा इतिहास पाहताना पुढील टप्यांचा आधार घ्यावा लागेल :
सन
1880 पूर्वी : मृदा भूगोल व मृदाशास्त्राचा अभ्यास हा सन 1880 पूर्वी खऱ्या अर्थाने
संथ गतीने होत होता. या काळात मृदा फक्त भूगर्भशास्त्राचा अभ्यास घटक मानला जात होता.
सन 1862 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ फेडरिक फालोअ Friedrich Fallou याने पहिल्यांदा
pedology मृदाशास्त्र ही संकल्पना मांडली. जर्मन रसायनतंज्ञ जस्टस फॉन लीबिग
यांनी ही संकल्पना विकसित केली. रसायनशास्त्रज्ञांनी मृदा हे वनस्पतींच्या वाढीचे माध्यम
आहे अशी संकल्पना गृहीत धरून अभ्यास केला जात होता.
रशियन शास्त्रज्ञ व्ही. व्ही. डोकुचॉव्ह यांनी सर्वप्रथम पुराभूरुपशास्त्रीय संशोधन केले. तदनंतर सन 1879 मध्ये रशियन शास्त्रज्ञ व्ही. व्ही. डोकुचॉव्ह यांनी मृदानिर्मितीच्या घटकांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. या काळात थोड्या प्रमाणात रशिया व युरोपमध्ये मृदेचा अभ्यास सुरू झाला होता.
सन
1880 ते 1900 : मृदा अभ्यासाचा हा दुसरा व महत्त्वाचा टप्पा मानना जातो. यामध्ये मृदेच्या
मूलभूत संकल्पना, मृदेची रचना, मृदेचे घर, मृदा व नैसर्गिक घटक यांचा सहसंबंध व मृदा
भूगोलाच्या प्रारंभिक संकल्पना या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. सन 1898-99 या काळात
रशियन शास्त्रज्ञ व्ही. व्ही. डोकुचॉव्ह यांनी मृदा सर्वेक्षणाची नवीन पद्धत शोधून
काढली व या पद्धतीने रशियातील मृदेचे सर्वेक्षण केले. तसेच युरोपमध्येही या पद्धतीचा
वापर करण्यात आला. त्या काळात मृदा नकाशा तयार करण्यात आला, त्यानुसार पर्वतीय भागातील
व मैदानी भागातील मृदेची रचना व मृदेचे स्वरूप भिन्न असते असे नमूद केले.
व्ही.
व्ही. डोकुचोव्ह यांनी या काळात मृदेच्या रचनेचे आडवे (Horizontal) व उभे
(Vertical) विभाग तयार करणारा सैद्धान्तिक नियम तयार केला. 1900 साली व्ही. व्ही. डोकुचॉव्ह
यांनी उत्तर गोलार्धातील मृदा विभागाचा अभ्यास करून त्यांचे विश्लेषण सांगितले. यामध्ये
आर्टिक मृदा, जंगली मृदा, चर्नोझम मृदा, स्टेपी व लॅटेराइट मृदा इत्यादी विभागाची माहिती
दिली.
सन
1900 ते 1940 : मृदा अभ्यासाचा हा तिसरा व महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये जागतिक मृदा
वर्गीकरण, प्रादेशिक मृदा विश्लेषण, जागतिक मृदा वितरण या घटकांच्या अभ्यासाचा समावेश
होतो. रशियन शास्त्रज्ञ एन. ए. डिमो (N. A. Dimo) आणि बी. ए. केलर (B. A. Keller) यांनी
मृदा भूगोलातील नवीन संकल्पनांचा अभ्यास केला. यामध्ये 1907 साली वाळवंटातील मृदेचा
अभ्यास केला. सूक्ष्म घटक व मृदा यांच्या सहसंबंधाचे विश्लेषण केले. त्यानंतर सन
1908 मध्ये के. डी. ग्लिन्का (K. D. Glinka) यांनी मध्य-पूर्व आशिया, पश्चिम सैबेरिया,
अमुर नदीचा किनारा या ठिकाणच्या मृदा व वनस्पतींचा अभ्यास केला. जैविक घटकांचा प्रभाव
कसा होतो याचे स्पष्टीकरण दिले. तसेच के. डी. ग्लिन्का यांनी 1914 साली मृदेच्या निर्मितीचे
घटक स्पष्ट केले. यामध्ये त्यांनी जैविक, हवामान व प्राकृतिक घटकांना महत्त्व दिले.
1916
साली एल. आय, प्रसोलोबो (L. I. Prasolevo) या शास्त्रज्ञाने युरोप व आशिया खंडांतील
मैदानी व पर्वतीय प्रदेशातील मृदेची माहिती गोळा केली. त्यामुळे या भागातील मृदेच्या
वितरणाचा शोध लागला. सन 1920 ते 1930 या दशकामध्ये जगातील अनेक भागांत मृदेची सर्वेक्षणे
करण्यात आली. कृषी व मृदा यांचा सहसंबंध स्पष्ट करण्यात आला. या काळात लघू व मध्यम
प्रमाणाचे मृदा नकाशे तयार करण्यात आले. यामध्ये आशिया (1927) आणि युरोप (1930) यांचा
समावेश केला होता. संयुक्त संस्थानामधील मृदाशास्त्रज्ञ सी. एफ. मार्बट (C. F.
Marbut) यांनी सन 1913 ते 1935 या कालखंडात संयुक्त संस्थानामधील मृदा सर्वेक्षण विभागांचे
प्रमुख म्हणून काम केले. या काळात त्यांनी संयुक्त संस्थानातील विविध भागातील मृदा
विभागाचे सर्वेक्षण केले व त्याचे अहवाल सादर केले. तसेच त्यांनी संयुक्त संस्थानामधील
पहिली सर्वसाधारण मृदा वर्गीकरण पद्धत विकसित केली. 1927 साली त्यांनी के. डी, ग्लिन्का
या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या 'जगातील मुख्य मृदेचे विभाग आणि त्यांचा विकास' (The
Great Soil Group of the World and their Development) या जर्मन भाषेतील पुस्तकाचे
रूपांतर इंग्रजी भाषेत केले.
सन
1916 ते 1924 या काळात जे. ए. प्रेसकॉट (0. A. Presscott) या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने
इजिप्तमधील कृषी विभागात काम करत असताना मृदेतील नायट्रोजन व अल्कली या घटकांचा अभ्यास
केला व शोधनिबंध प्रकाशित केले.
1927
साली सी. एफ. मार्बट (C.F. Marbat) या अमेरिकन शास्त्रज्ञाने तर 1932 व 1936 साली अनुक्रमे
शाँ (Shaw) व जोफी (Joffe) या शास्त्रज्ञांनी मृदानिर्मितीच्या घटकांचाअभ्यास केला.
यामध्ये शॉ यांनी पहिल्यांदा मृदानिर्मितीचे समीकरण मांडले.
लेनिनग्राड
व मॉस्को विद्यापीठांत सन 1930 च्या दशकात मृदा भूगोलाचे स्वतंत्र विभाग स्थापन केले
गेले.
सन
1940 ते 1960 : मृदा भूगोलाच्या इतिहासाचा हा चौथा टप्या आहे. यामध्ये मृदानिर्मितीचे
घटक, मृदेतील घटक, सुधारित जागतिक मृदेचे वर्गीकरण व मृदा नकाशे यांच्या अभ्यासावर
भर देण्यात आला. या काळात एच. जेन्नी (H. Jenny) या मृदाशास्त्रज्ञाने मृदाशास्त्राचा
अभ्यास करून 'मृदानिर्मितीचे घटक संख्याशास्त्रीय प्रणाली' या ग्रंथाचे प्रकाशन केले.
त्यामध्ये त्यांनी
1941
साली मृदानिर्मितीच्या घटकांचे विश्लेषण सांगताना [s = f (cl, o, r, p, t. n...)]
या
समीकरणाचा वापर केला आहे.
यू.
एस. एस. आर यांनी 1954 साली कृषी विभाग व मृदा यांच्या सर्वेक्षणातून मृदा नकाशे तयार
केले व ते जगाच्या प्राकृतिक भौगोलिक नकाशासंग्रहात प्रकाशित केले. याच काळात काही
शास्त्रज्ञांनी व्ही. व्ही. डोकुचॉव्हच्या सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून रशिया व युरोपमधील
विविध विभागांचे सर्वेक्षण केले.
सन
1960 नंतर : हा मृदा भूगोलाच्या इतिहासातील अलीकडचा कालखंड आहे. या काळात जागतिक मृदा
वर्गीकरण, संकल्पना, प्रारंभिक मृदा नमुने , मृदा आच्छादन संकल्पना व मृदा नकाशे या
घटकांवर भर देण्यात आला. 1977 साली रझानोव्ह (Razanov) या शास्त्रज्ञाने जागतिक मृदेचे
विश्लेषण केले आणि त्याचे पाच गट केले. त्यामध्ये अतिमोठा (Mega), मोठा (Macro), मध्यम
(Meso), सूक्ष्म (Micro), अतिसूक्ष्म (Nano Structural) या गटांचा समावेश होतो. तसेच
काही रशियन व अमेरिकन शास्त्रज्ञांनी मृदा व भूरूपशास्त्र यांच्या सहसंबंधाचा अभ्यास
केला. यामध्ये डॅनियल (Daniels) या शास्त्रज्ञाचा महत्त्वाचा सहभाग आहे. सन 1984 व
1995 या काळात मृदेच्या वितरणाचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला गेला. यामध्ये जगातील
विविध विभागातील मृदेचे वितरण दर्शविण्यात आले.
सन
1990 नंतर नवीन मृदा वर्गीकरणाच्या पद्धती विकसित झाल्या. यामध्ये मृदेच्या रचनेचा
अभ्यास होऊ लागला. एकविसाव्या शतकात मृदा भूगोलाचा अभ्यास संख्याशास्त्रीय व संगणकाच्या
आधारे होऊ लागला. यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) व सुदूर संवेदन (RS) यांसारख्या
प्रणालींचा वापर सुरू झाला. सध्या उपग्रह प्रतिमा व नकाशे यांच्या आधारे जगातील विविध
भागांतील मृदेचा अभ्यास केला जातो.
(मोडूल २)
मृदा निर्मिती व गुणधर्म
२.१ प्रस्तावना
२.२ विषय विवेचन२.२.१ हँस जेनी यांचे मृदा निर्मितीच्या घटकांचे प्रतिमान (मृदा निर्मितीचे घटक)
अ. जनक खडक
ब. भूपृष्ठरचना
क. हवामान
ड. सेंद्रीय द्रव्यपदार्थ
इ. कालावधी
फ. मानव (हँस जेनी यांच्या प्रतिमानात समाविष्ठ नसलेला घटक)
२.२.२ मृदा निर्मिती क्रिया
१. प्राकृतिक क्रिया
२. जैविक क्रिया
३. रासायनिक क्रिया
२.२.३ मृदेचे भौतिक गुणधर्म / प्राकृतिक गुणधर्मः
कणांचा
प्रकार
|
चिकणमाती
|
गाळ/पोयटा
|
बारीक
वाळू
|
जाड
वाळू
|
कणांचा
व्यास (मि.मि.)
|
०.००२पेक्षा
कमी
|
०.००२-०.०२
|
०.०२-०.२
|
०.२-२.०
|
जलसंधारणशक्ती
|
सर्वात
जास्त
|
जास्त
|
कमी
|
सर्वात
कमी
|
पोताचा
प्रकार
|
स्पर्श
व आकार गणधर्म
|
भारी
चिकण
|
अत्यंत
चिकट, गुळगुळीत, मृदेच्या गोळयास आकार देता येतो, मृदेची तार काढता येते.
|
चिकण
पोयटा
|
ओली
मृदा हातास चिकटते. मृदेच्या गोळयास कोणताही आकार देण्यास सुलभ.
|
पोयटा
/ गाळ
|
ओल्या
स्थितीत मऊ लोण्यासारखा, हातास चिकटत नाही.
|
वाळुमय
चिकण
|
चिकट
परंतु थोड़ी खरखरीत, मृदेच्या गोळयास आकार देता येतो.
|
वाळूमय
पोयटा
|
बारीक
वाळूचे प्रमाण अधिक, खरखरीतपणा थोड कमी.
|
वाळूसर
/ भरड
|
अत्यंत
खरखरीत, मृदेचे कण एकमेकांना चिकटून राहत नाही.
|
२. मृदेची संरचना
३. मृदाकणातील पोकळी / हवा
४. मृदेचे तापमान
५. मृदेचा रंग
६. मृदेचा ओलावा / पाणी
२.२.४ मृदेचे रासायनिक गुणधर्म
1 मृदेचा सामू /मृदेची आम्ल विम्लता निर्देशांक
2 मृदेतील जैविक घटक
3 मृदेतील नत्र, स्फुरद, पालाश
3.1 नत्र
3.2 स्फुरद (फॉस्फेट)
3.3 पोटॅशिअम /पालाश
२.३ सारांश
२.४ पारिभाषिक शब्द
२.५ स्वयं अध्ययन प्रश्न
२.६ स्वयं अध्ययन उत्तरे
अधिकच्या वाचनाची पुस्तके व वेबसाइट
- मृदा भूगोल, ए.बी. सवदी व पी.एस. कोळेकर, निराली
प्रकाशन,
- मृदा भूगोल, डॉ. प्रकाश सावंत, फडके प्रकाशन
- ENCYCLOPEDIA of SDIL
SCIENCE, ediled by WARD CHESWORTH, University of Guelph Canada ISBN:
978-1-4020-3994-2 Spinger Dararechi Bedin, Hiadelterg, New Yark
- Keys to Soil Taxonomy, By
Soil Survey Staff, United States Department of Agriculture Natural Resources
Conservation Service, Tenth Edition, 2006
- http://higheredbcs.wiley.corri/legacy/college/strahler/0471417415/animations/ch10/animation.html
- http://isgs.illinols.edu/about-isgs/staff-dir/d/domier/biomantle.swf
Very good sir
ReplyDeleteVery nice sir
DeleteThank You Sir. 😊👍👌
DeleteThanks sir..😊
ReplyDelete